नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुस-या टर्मची औपचारिक सुरवात आज झाली. डॉ. सिंग यांच्याव्यतिरिक्त १९ मंत्र्यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार समारंभात मंत्रिपदाची शपथ घेतली.
डॉ. सिंग यांच्या नव्या टीममध्ये काही जुने तर काही नवे चेहरे आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रणव मुखर्जी, शरद पवार, ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, ममता बॅनर्जी, एस. एम. कृष्णा, गुलामनबी आझाद, सुशीलकुमार शिंदे, एम. वीरप्पा मोईली, एस. जयपाल रेड्डी, कमलनाथ, वायलर रवी, मीराकुमार, मुरली देवरा, कपिल सिब्बल, अंबिका सोनी, बी. के. हांडीक, आनंद शर्मा आणि सी. पी. जोशी यांचा समावेश आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना सर्व मंत्र्यांना शपथ दिली.पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील तीन जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि तृणमूळ कॉंग्रेस या दोन घटक पक्षांच्याच नेत्यांनाच पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
पंतप्रधान डॉ. सिंग यांनी इंग्रजीतून मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पवार, कमलनाथ, मीराकुमार आणि जोशी यांनी हिंदीतून तर मुखर्जी, अँटनी, चिदंबरम, बॅनर्जी, कृष्णा, आझाद, शिंदे, मोईली, रेड्डी, रवी, देवरा, सिब्बल, सोनी, हांडीक आणि शर्मा यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील तिघांची वर्णी लागली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि मुरली देवरा यांचा समावेश आहे.
मंत्रिपदावरून चर्चा फिसकटल्याने द्रविड मुन्नेत्र कळघमने सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर केला. देशभरातील विविध क्षेत्रातील नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.